गडचिरोली : सध्या म्हैसूर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था येथे कार्यरत असलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले शास्त्रज्ञ डॉ.प्रकाश एम. हलामी यांची ओपनप्लेक्स डेटाबेस 2025 च्या साय-रँक ग्लोबल रजिस्ट्रीमध्ये जगातील पाच टक्के सर्वोत्तम शास्त्रज्ञांमध्ये निवड झाली आहे. जागतिक स्तरावर निवड झालेले ते जिल्ह्यातील पहिलेच संशोधक ठरले आहेत.

साय रँक ग्लोबल इंडेक्स एक वार्षिक डेटा आधारित मानांकन आणि प्रमाणीकरण प्रणाली असून जी ग्रंथमापन डेटा वापरून दरवर्षी जगातील सक्रिय संशोधकांचे मूल्यांकन करते. हे मानांकन वार्षिक डेटा स्नॅपशॉटमधून तयार केले जाते. याद्वारे असे निदर्शनास आले की जगभरातील सुमारे 12 कोटी संशोधकांपैकी केवळ एक कोटी सक्रिय संशोधक आहेत. भारतामध्ये एक मोठा वैज्ञानिक समूह आहे तसेच बरेच संशोधन संस्था व विद्यापीठे देखील आहेत, मात्र विकसनशील देशाच्या तुलनेत येथील संशोधकांच्या एकूण प्रोफाईलचे प्रमाण केवळ 2 टक्के इतकेच आहे.
डॉ. प्रकाश हलामी यांना तीन दशकांहून अधिक संशोधन क्षेत्राचा अनुभव असून जगातील शीर्षस्थानी असलेल्या संशोधकांपैकी एक म्हणून त्यांच्या वैज्ञानिक योगदानाला मान्यता मिळाली आहे. हा बहुमान त्यांच्या व्यापक मेटाडेटाच्या आधारे देण्यात आला, ज्यामध्ये लाखो संशोधक, प्रकाशने, संस्था, संशोधन विषय यांचा तुलनात्मक आणि सखोल अभ्यास केला गेला.
डॅा.हलामी यांचे संशोधनात्मक योगदान
डॉ.प्रकाश हलामी यांनी त्यांच्या संशोधन कार्यात फायटीक आम्ल, शरीरातील पेशी, साखरयुक्त सेंद्रिय पदार्थ, समुद्रातील तण यासारख्या पदार्थावर सूक्ष्मजीवांच्या वापरसंबंधातील मोठे योगदान आहे. तसेच आण्विक जीवशास्त्र, प्रोबायोटिक, कार्यात्मक अन्न, अन्न सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, त्याचप्रमाणे जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी बीफिडो-कर्ड, प्रोबायोटिक गाजर नेक्टर, बीफिडोबॅक्टेरिया समृद्ध सोया कर्ड, ही तीन तंत्रज्ञान विकसित करून हस्तांतरित केले आहे. तसेच संगणकीय अभ्यासासाठी एक लक्टोबॅसिलासी एक्सप्लोरर सॉफ्टवेअर देखिल त्यांनी विकसित केले.
कोरोना काळात कोविड 19 चाचणी केंद्राची स्थापना करून सात लाखाहून अधिक RT – PCR नमुन्यांची यशस्वी चाचणी त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. याव्यतिरिक्त ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड च्या FAD 29 अल्कोहोलिक ड्रिंक्स पॅनल चे अध्यक्ष आणि ‘BioE3’ धोरणांतर्गत कार्यक्षम अन्नपदार्थ विषयावरील भारत सरकारच्या प्रकल्पावरील ‘DBT- BIRAC’ संयुक्त स्क्रिनिंग कम निवड समितीचे सहअध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करीत आहे. तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हैसूर येथे विविध विभागाचे प्रमुख, एसटी, एससी, दिव्यांग, माजी सैनिक कर्मचाऱ्यांसाठी संपर्क अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 2024-25 या वर्षासाठी ‘जनजातीय गौरव वर्ष’ या केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती व त्यांनी यशस्वीरित्या ती जबाबदारी पूर्ण केली. त्यांचे नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान विकास, धोरणात्मक योगदान, मार्गदर्शन, सार्वजनिक आरोग्याविषयी असलेली त्यांची जागरूकता यामुळे साय रँक ग्लोबल इंडेक्सकडून मिळालेला सन्मान हा त्यांच्या प्रामाणिक आणि कठोर परिश्रमाच फळ आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला या छोट्याश्या गावात झाले आहे. त्यानंतर ब्रम्हपुरी, पदवीचे शिक्षण नागपूर तर त्यानंतरचे शिक्षण दिल्ली येथून पूर्ण केले. गरिबी, कौटुंबिक जबाबदारी, संसाधनांची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी जागतिक पातळीपर्यंत मजल मारली.
































