Home दैनंदिन बातम्या जिल्हा वर्धापन दिनी ‘विकसित गडचिरोली 2047’चा संकल्प

जिल्हा वर्धापन दिनी ‘विकसित गडचिरोली 2047’चा संकल्प

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृह येथे ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली- व्हिजन 2047’ च्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ‘विकसित गडचिरोली व्हिजन 2047’चे सादरीकरण करून मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. (खाली वाचा)

या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार डॉ.देवराव होळी यांनी उपस्थित नागरिकांना ‘विकसित गडचिरोली व्हिजन 2047’चे सादरीकरण केले. दि.16 व 17 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मांडलेल्या सूचना, संकल्पना व विकासाच्या दिशांचा आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला. (खाली वाचा)वाचा)

जिल्हा निर्मितीसाठी योगदान देणाऱ्यांना गौरव
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी झाली. स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी कै.बाबुराव मडावी, माजी खासदार मारोतराव कोवासे आणि माजी आमदार पेंटरामा तलांडी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी स्मरण करण्यात आले. (खाली वाचा)

जिल्हा निर्मितीसाठी योगदान देणारे सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानून त्यांना अभिवादन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला आज 44 वर्षे पूर्ण झाली असून, या कालखंडात जिल्ह्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांतील असंख्य व्यक्तींनी योगदान दिले. त्यांच्या योगदानाचा गौरव करीत आता पुढील वाटचाल अधिक व्यापक, विकासाच्या संकल्पाने करण्याची गरज असल्याचे डॉ.होळी यांनी सांगितले. (खाली वाचा)

‘गडचिरोली 2047’साठी ठोस विकास आराखडा
44 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा सन 2047 पर्यंत विकसित, सक्षम आणि समृद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी विविध क्षेत्रांसाठी ठोस उद्दिष्टे आणि विकासाचा आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. (खाली वाचा) 

जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी- कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने केंद्र व राज्य शासनाचे निर्णय, नियम आणि आपल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास गडचिरोलीच्या विकासाला मोठी गती मिळू शकते. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून ‘विकसित गडचिरोली व्हिजन 2047’ साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. (खाली वाचा)

अहेरीला अधिक प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच अहेरी उपविभागातील नागरिकांना प्रशासन अधिक जवळून उपलब्ध व्हावे, यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहेरी निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या कार्यालयाला शासनाच्या आदेशानुसार आवश्यक प्रशासकीय व इतर अधिकार पूर्णपणे उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.होळी म्हणाले. (खाली वाचा)

स्वतंत्र ‘शैक्षणिक विकास आराखडा’ तयार करण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ‘शैक्षणिक विकास आराखडा – गडचिरोली 2047’ तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे टप्प्याटप्प्याने डिजिटल शाळांमध्ये रूपांतर करणे, गडचिरोली शहरातील नेहरू शाळेच्या धर्तीवर निवडक शासकीय शाळांचा आधुनिक व डिजिटल पद्धतीने विकास करणे, तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे डिजिटल आणि मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करणे, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा व ग्रंथालये उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. (खाली वाचा)

‘गोंडवाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ नामकरणाचा मानस
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र आरोग्य विकास आराखडा आवश्यक असल्याचे डॉ.होळी यांनी सांगितले. गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्नांचा निर्धार
शिक्षण, आरोग्य, प्रशासन, रोजगार, शेती, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधून सन 2047 पर्यंत गडचिरोली जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविणे हा ‘विकसित गडचिरोली व्हिजन 2047’चा प्रमुख संकल्प असल्याचे डॉ.देवराव होळी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे संचालक लोक कलावंत विजय शेंडे व आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके यांनी केले.