Home क्राईम छत्तीसगड सीमेकडच्या जंगलातील हायप्रोफाईल जुगारावर मध्यरात्री धाड

छत्तीसगड सीमेकडच्या जंगलातील हायप्रोफाईल जुगारावर मध्यरात्री धाड

23 कार जप्त, 34 आरोपींना अटक

कोरची : तालुक्यातल्या कोटगुल जवळील नांगपूरच्या जंगलात चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह कोटगुल ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकली. यात 23 कार, रोख 4 लाख 41 हजार रुपये आणि जुगारासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर साहित्यासह एकूण दिड कोटीचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईत जुगार खेळण्यासाठी आलेल्या लोकांसह एकूण 34 लोकांना अटक करण्यात आली. दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशानुसार केलेल्या या कारवाईने जुगार शौकिनांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर लोहंबरे रा.नांगपूर (ता.कोरची) आणि मिथुन तांबेकर रा.कोटगुल (ता.कोरची) हे मौजा नांगपूरच्या जंगल परिसरात बेकायदेशिररित्या ताश पत्त्यांच्या सहाय्याने जुगार चालवतात अशी गोपनिय माहिती गडचिरोलीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, दि.17 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.भगतसिंग दुल्हत व पोलीस पथकाने नांगपूर येथे पोहोचून दोन पंचांसह जंगल परीसरात घटनास्थळी धाड टाकली असता. त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या 52 ताश पत्त्यांच्या सहाय्याने पैशाची बाजी लाऊन जुगाराचा खेळ सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह कोटगुल ठाण्याचे पोउपनि. विवेक वायकर व पथकाला 34 लोकांना पकडण्यात यश आले.

या कारवाईत छत्तीसगडमधील बिरेंद्रकुमार एवनलाल सिन्हा रा.कोटरासरार जि.राजनांदगाव (छ.ग.) आणि प्रकाशकुमार शामलाल मेश्राम, रा.बजरंग मार्ग, जि.राजनांदगाव (छ.ग.) तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरोपींसह एकूण 34 जणांना, तसेच जुगार साहित्य आणि रोख रक्कम ताब्यात घेतली. आरोपींच्या अंगझडती दरम्यान घटनास्थळावरुन 4 लाख 41 हजार 500 रुपये रोख, तसेच 23 चारचाकी वाहने, 5 दुचाकी वाहने, जुगार खेळण्याचे पत्ते, स्टीलची पेटी, लाल रंगाटी बॅटरी, ताडपत्री असा एकूण 1,50,97,100 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थागुशाचे पोनि.अरुण फेगडे, सपोनि.भगतसिंग दुल्हत, हवालदार सतीश कत्तीवार, अंमलदार तुषार खोब्रागडे, बापू कुम्मरी, तसेच कोटगुलचे पोउपनि. विवेक वायकर, सहायक उपनिरीक्षक भजनराव कोडापे, अंमलदार संदीप बागडे व किशोर बावणे यांनी केली.