
एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी परिसरात सध्या वाघांची दहशत प्रचंड वाढली आहे. परिसरातील तब्बल 40 गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाघांच्या वाढत्या वावरामुळे शेतीची कामेही रखडली आहेत. दोलंदा येथील हरी वड्डे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर या परिसरात भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे. त्यातच पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले आणि विविध ठिकाणी वाघांचे होणारे दर्शन यामुळे नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत.
घाबरलेल्या शेतकऱ्यांसाठी सध्या शेतावर जाणेही कठीण झाले आहे. पाळीव जनावरे चरायला घेऊन जाण्यासही नागरिक धजावत नाहीत. एवढेच नाही तर गावाकडून ये-जा करताना रस्त्यालगतच्या झुडूपांमध्ये वाघ दबा धरून बसलेला असेल आणि अचानक हल्ला करेल, या भीतीने नागरिकांनी रस्त्याच्या कडेला असलेली झुडूपे साफ करण्यास सुरुवात केली आहे.
वाघाचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी नागरिकांनी नुकतेच जारावंडी येथे चक्काजाम आंदोलन करत वनविभागाचे लक्ष वेधले. मात्र बंदोबस्त झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
































