भामरागड : जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला भामरागड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार निश्चित करण्यात आलेल्या 500 पूरबाधित कुटुंबांना दि.21 ऑगस्ट रोजी टाटा स्टिल फाउंडेशनच्या पुढाकाराने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे भामरागड येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी वस्तीत शिरल्याने अनेक कुटुंबांचे अन्नधान्य व घरगुती साहित्याचे नुकसान झाले. या काळात सुमारे 700 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. पूर ओसरल्यानंतर तहसील प्रशासनाने बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण करून मदतीसाठी 500 कुटुंबे निश्चित केली.
वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये तांदूळ, गहू, तूरडाळ, पोहे, साखर, खाद्यतेल, मीठ, मसाले, साबण, केसांचे तेल तसेच ब्लँकेट आदी वस्तूंचा समावेश होता. याशिवाय 200 स्टेशनरी किटचेही वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार किशोर बागडे, नायब तहसीलदार राजीव निखत, तहसील कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी तसेच टाटा स्टील फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
































