गडचिरोली : आदिवासी आश्रमशाळांमधील समस्या दूर करण्याऐवजी त्या आणखी वाढवणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके तथा संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संघाचे मार्गदर्शक नंदू नरोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले असून येत्या 28 सप्टेंबरला धडक मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाचे मार्गदर्शक नंदू नरोटे, अ.भा.काँग्रेस कमिटीच्या सचिव कुसूम अलाम, सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी, आविसंचे गडचिरोलीचे अध्यक्ष विलास नरोटे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणारे ड्रेस, धान्य व इतर साहित्य प्रकल्प स्तरावरून खरेदी न करता थेट राज्यस्तरावरून पुरवठा करण्याची पद्धत भ्रष्टाचाराला अधिक खतपाणी घालणारी असल्याचा आरोप नरोटे यांनी केला. कारण मुख्य पुरवठादार प्रत्यक्षात सर्वांना पुरवठा करू शकत नाही. त्यांचे पेटी काँट्रॅक्टर पुरवठा करतात. त्यांच्या निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवले जात आहे. सध्या पुरवठा झालेले धान्य निकृष्ट असल्याने त्याची एफडीए कडे तक्रार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घेण्यासोबत आदिवासी आयुक्त लिना बन्सोड, स्थानिक प्रकल्प अधिकारी अरुम एम. यांच्याकडून होत असलेल्या दु्र्लक्षासाठी त्यांना निलंबित करावे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या 25 कोटी रुपयांच्या निधीत भ्रष्टाचार करणारे वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरुण एम. यांनाही निलंबित करून रानटी हत्तींपासून पिकांचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
































