अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी हर्षवर्धनबाबा आत्राम व डॉ.मिताली आत्राम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या भेटीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित विविध कामांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रलंबित प्रश्न विशेषत्वाने मांडण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण मार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी हर्षवर्धनबाबा व डॉ.मिताली आत्राम यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली. तसेच आलापल्ली–सिरोंचा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या मार्गाला भेट द्यावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे काम पूर्ण होणे ही परिसराची प्रमुख गरज असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना गडकरी यांनी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती हर्षवर्धनबाबा आत्राम व डॉ.मिताली आत्राम यांनी दिली.
या भेटीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
































