आरमोरी : तालुक्यातील मौजा शिर्शी येथे रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सोमवारी शिर्शी येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणीदरम्यान गजबे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हत्तींच्या उपद्रवामुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतीत निर्माण झालेली असुरक्षितता आणि शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट याबाबत ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचे सर्वे क्रमांक आणि संबंधित माहितीही सादर केली.
शेतकऱ्यांना धीर देत माजी आमदार गजबे यांनी शासनाकडून योग्य आणि भरीव नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पाहणीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पाशेवार, बाजार समितीचे सदस्य मंगेश चापले यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी वासुदेव पेंदाम, सुखदेव पेंदाम, अनिल पेंदाम तसेच इतरही अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
































