
गडचिरोली : शहराजवळील चुरमुरा आणि पोर्ला वनपरिक्षेत्रात काही दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. या हत्तींनी शेतातील उभ्या धानपिकाची प्रचंड नासाडी केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी चुरमुरा येथील शेताच्या बांधावर पोहोचून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत गावकऱ्यांना धीर दिला.
आकापूर, सूर्यडोंगरी, गणेशपूर आणि सिर्शी या भागांत धुमाकूळ घातल्यानंतर हत्तींच्या कळपाने आता चुरमुरा परिसरात मुक्काम ठोकला आहे. रात्रीच्या वेळी शेतातील उभी पिके तुडवून ते मातीमोल केले. केवळ शेतातील पिकांचेच नव्हे, तर पाड्यावर तुर व इतर कडधान्याची नासधूस केली. हत्तींच्या या वावरामुळे शेतकरी व स्थानिक गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरूनच मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ.अशोक नेते यांनी घटनास्थळावरूनच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.हत्तींच्या कळपाला मानवी वस्ती व शेतात शिरण्यापासून रोखावे, तसेच बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना तात्काळ भरपाई मिळवून द्यावी,” अशी सूचना त्यांनी वनविभागाला केली.
गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाहणीदरम्यान डॉ.अशोक नेते यांनी केले. हत्तींचे अस्तित्व जंगलात किंवा शेतात एकटे जाऊ नका, हत्तींचा कळप परिसरात असल्याने बाहेर पडताना नेहमी 4 ते 5 जणांच्या गटानेच जावे. हत्तींच्या हालचालींचा सुगावा लागल्यास तात्काळ इतर गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचित करा, अशा सूचना त्यांनी गावकऱ्यांना केल्या.
या पाहणी दौऱ्यात भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी. पाचभाई, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, वनरक्षक टेकाम, डी.आर.रोकडे, दशरथ सोनटक्के, धुरंधर सातपुते, अमर बोबाटे, विकास पायडलवार, विलास चंदनखेडे, तसेच वनविभागाचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































