गडचिरोली : गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील शिवणी पुलाजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी बस अपघातातील जखमी प्रवाशांना योग्य मदत व नुकसानभरपाई मिळावी, तसेच जखमी प्रवाशांकडून करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करावी, या मागणीसाठी सीजेपीच्या गडचिरोलीतील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन दिले.
जखमी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगार प्रमुखांकडून प्रतिव्यक्ती ₹1,000 ची मदत देण्यात आली. मात्र ही रक्कम स्वीकारली नाही तर यापुढे कोणतीही मदत मिळणार नाही, असे सांगण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच, जखमी प्रवाशांकडे एसटीचे तिकीट असेल तरच मदत मिळेल आणि तिकीट नसेल तर कोणतीही मदत मिळणार नाही, असे सांगण्यात आले. याबाबत चौकशी करून तिकीट नसलेल्या अथवा तिकीट हरवलेल्या जखमी प्रवाशांना मदतीबाबतचे अधिकृत नियम स्पष्ट करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
जखमी प्रवाशांना महामंडळाच्या लागू नियमांनुसार मिळणारी नुकसानभरपाई, वैद्यकीय मदत आणि पुढील उपचाराबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळावे, तसेच केवळ ₹1,000 ची मदत कोणत्या नियमांनुसार देण्यात आली याची माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिवणी पुलाजवळील रस्त्याची स्थिती, अपूर्ण पुलाचे काम आणि अपघाताची संभाव्य कारणे यांचीही चौकशी करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून जखमी प्रवाशांना योग्य मदत व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सीजेपीचे कार्यकर्ते सुरज पिपरे, दिलावर साखरे, जावेद खान, कल्पक चंद्रगिरे, पियुष ताटलावार आणि सक्षम रामटेके यांनी केली आहे.
































