गडचिरोली : भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या वतीने गडचिरोली येथील आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या ‘कर्तव्यकक्ष’ या जनसंपर्क कार्यालयात आदिवासी मोर्चाची जिल्हा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत आदिवासी समाजाचे न्याय्य हक्क, सामाजिक विकास, संघटनात्मक बळकटीकरण, तसेच 15 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन जिल्हाभरात व्यापक स्वरूपात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (खाली वाचा)


या बैठकीच्या मंचावर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, अनुसूचित जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन कोडवते, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, आणि ज्येष्ठ नेत्या डॉ.चंदा कोडवते यांची प्रमुख उपस्थिती होती. (खाली वाचा)

याशिवाय न.प. सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका वर्षा शेडमाके, माजी सभापती रंजिता कोडापे, मोर्चाचे जिल्हा महामंत्री विनय मडावी, रेवणनाथ कुसराम, ओंकार मडावी, प्रशांत आत्राम आणि जिल्हा व तालुका स्तरावरील अनुसूचित जनजाती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (खाली वाचा)

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अशोक नेते म्हणाले, आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, सामाजिक सन्मान आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्रातील भाजपा सरकारने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेला 15 नोव्हेंबर हा ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. (खाली वाचा)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून घोषित केला. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2021 रोजी देशात पहिला जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेले योगदान, त्यांचे बलिदान, आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मिता यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, तसेच भावी पिढीला या महान क्रांतिकारकांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश होता. (खाली वाचा)

भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित करून उभारलेला ‘उलगुलान’ हा ऐतिहासिक लढा आजही समाजाला संघर्ष, स्वाभिमान आणि एकतेची प्रेरणा देतो. महान क्रांतिकारकांच्या विचारांचा आणि बलिदानाचा वारसा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन डॅा.अशोक नेते यांनी केले. (खाली वाचा)

यंदा 15 नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिन गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुका आणि शहरासह संपूर्ण जिल्हाभर उत्साहात, व्यापक स्वरूपात आणि जनसहभागातून साजरा करण्यात यावा. आदिवासी समाजबांधवांनी, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा व आदिवासी क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन डॉ.अशोक नेते यांनी या बैठकीत केले. (खाली वाचा)

बैठकीत आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर, संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यावर, तसेच जनजातीय गौरव दिनाच्या आयोजनाबाबत जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन करण्यावर भर देण्यात आला. ‘जय सेवा, सेवा जोहार!’ या घोषणेसह आदिवासी समाजाचा स्वाभिमान, एकता आणि गौरवशाली परंपरा जपण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला.







































