गडचिरोली : युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सन 2026-27 च्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन येत्या 19 नोव्हेंबर रोजी कॉम्प्लेक्स भागातील जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कवितालेखन या पाच कलाप्रकारांतील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील युवा वर्गाला मिळणार आहेत. (खाली वाचा)


या महोत्सवात सहभागी होऊन कला सादर करण्यासाठी इच्छुक युवक-युवतींनी 17 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरांचे जतन, सुप्त कलागुणांना प्रोत्साहन आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे, या उद्देशाने सदर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला ‘विकसित भारत @2047’ या दृष्टिकोनाशी जोडण्यात आले असून, त्याअंतर्गत जिल्हास्तरावर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

महोत्सवात 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकतील. वयाची परिगणना 17 ऑगस्ट 2026 या दिनांकानुसार केली जाईल. जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या युवा कलाकार व संघांना विभागस्तरावर कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. पुढे विभागस्तरावरील कामगिरीनुसार राज्यस्तरावर आणि राज्यस्तरावरील कामगिरीनुसार राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल. प्रत्येक स्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या कलाकार व संघांना शासनाकडून रोख पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

सहभागासाठी स्पर्धकांनी प्रथम ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या गुगल फॉर्ममध्ये नोंदणी करावी.

तसेच कार्यालयातून प्रवेश अर्जाचा नमुना प्राप्त करून, भरलेला अर्ज व ओळखपत्र 17 नोव्हेंबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जमा करावे.

स्पर्धांचे नियम, सहभागी कलाकारांची संख्या, सादरीकरणासाठी निर्धारित वेळ आणि नोंदणीसंबंधी सविस्तर माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यादव यांनी केले आहे.







































