Home पब्लिक प्रॉब्लेम अहेरी क्षेत्रातील तालुके दुष्काळग्रस्त करण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांना निवेदन

अहेरी क्षेत्रातील तालुके दुष्काळग्रस्त करण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांना निवेदन

हर्षवर्धनबाबा, डॉ.मितालीताई भेटले

अहेरी : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि अपेक्षित पाऊस न झाल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेनुसार युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम व डॉ.मिताली आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत त्यांना निवेदन सादर केले.

पाचही तालुक्यांतील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळ निवारण योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नवीन बोअरवेल मंजूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली.

रेगुंटा सबस्टेशनचे काम रखडले

रेगुंटा येथील विद्युत सबस्टेशनचे काम पूर्ण झाले असले तरी वन्यजीव विभागाच्या आवश्यक परवानगीअभावी पुढील काम रखडले आहे. संबंधित विभागाची परवानगी तातडीने मिळवून प्रलंबित काम सुरू करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यामुळे परिसरातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

याशिवाय अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते, वीज, पाणी पुरवठा, आरोग्य व शिक्षणासह विविध मूलभूत सुविधांचे प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली.