Home राजकीय घडामोडी परसवाडीत आदिवासी बांधवांसोबत आ.डॉ.नरोटे यांचा आनंदोत्सव

परसवाडीत आदिवासी बांधवांसोबत आ.डॉ.नरोटे यांचा आनंदोत्सव

ग्रामस्थांना फराळ व ब्लँकेटचे वाटप

धानोरा : गेली चार दशके नक्षलवादाच्या सावटाखाली राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्याची पहिली नक्षलमुक्त दिवाळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी धानोरा तालुक्यातील परसवाडी येथे आदिवासी बांधवांसोबत साजरी केली. भीती आणि तणावाच्या सावटातून बाहेर पडत शांतता व विश्वासाच्या वातावरणात साजऱ्या होणाऱ्या या दिवाळीनिमित्त त्यांनी ग्रामस्थांना फराळ आणि ब्लँकेटचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.

कधीकाळी दिवाळीसारख्या सणावरही भीतीचे सावट असलेल्या गडचिरोलीत यंदाची पहिली नक्षलमुक्त दिवाळी शांतता, नव्या आशा आणि उज्ज्वल भविष्याचा आनंदोत्सव ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाविरोधात उचलण्यात आलेल्या निर्णायक पावलांमुळे जिल्ह्यात शांततेचे नवे पर्व सुरू झाले आहे. जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षितता आणि विकासाला दिलेले प्राधान्य, तसेच सुरक्षा दलांचे समर्पण व वीर जवानांचे बलिदान यामुळे या परिवर्तनाला बळ मिळाले आहे. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद आदिवासी बांधवांसोबत वाटून घेण्यासाठी आमदार डॉ.नरोटे यांनी परसवाडीला भेट दिली.

यावेळी आमदारांनी ग्रामस्थांशी गोंडी भाषेत आपुलकीने संवाद साधला. गावाचा विकास आणि स्थानिक समस्यांवर चर्चा करत त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी व विकासासंदर्भातील अपेक्षा जाणून घेतल्या. त्यामुळे ही भेट दिवाळीच्या शुभेच्छांसोबतच गावाच्या प्रश्नांवरील संवादासाठीही महत्त्वाची ठरली.

या भेटीदरम्यान आमदार डॉ.नरोटे यांनी हरीशचंद्र मडावी यांच्या घरी भोजन केले. मडावी कुटुंबीयांचा प्रेमळ पाहुणचार आणि ग्रामस्थांच्या आपुलकीमुळे या स्नेहभेटीला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले. फराळाचा गोडवा, जिव्हाळ्याचा संवाद आणि एकत्र भोजनाचा आनंद यामुळे ही दिवाळी संस्मरणीय ठरली.

यावेळी भाजयुमोचे जिल्हा प्रभारी सारंग साळवे, भाजपा तालुका महामंत्री सुभाष धाईत, नगरपंचायत धानोराचे गटनेते तथा नगरसेवक संजय कुंडू, भाजपा तालुका कोषाध्यक्ष सुभाष खोबरे, युवा नेते अविनाश पोरेटी, लोकेश मशाखेत्री, नंदू शेंदरे आणि भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सौरभ सहारे उपस्थित होते.