Home राजकीय घडामोडी मा.खा.अशोक नेते यांची खरपुंडी येथे शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी

मा.खा.अशोक नेते यांची खरपुंडी येथे शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी

बालगोपालांमध्ये रमून वाटला आनंद

गडचिरोली : यंदा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आपलेपणाचा आधार मिळावा आणि सर्वसामान्य कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद वाटता यावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी मौजा खरपुंडी येथे शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.

गडचिरोली हा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ठ आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत दिवाळीचा आनंद वाटण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार डॉ.नेते यांनी शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांच्यासोबत सण साजरा केला. राजकीय पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीचे नाते आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त खरपुंडी गावातील हनुमान मंदिर येथे डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

यानंतर त्यांनी गावातील शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक आणि बालगोपालांची भेट घेतली. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. विशेष म्हणजे लहान मुलांसोबत स्वतः फुलझडी लावून त्यांच्या आनंदात सहभागी झाले. बालगोपालांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि उत्साहामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. शेतकरी कुटुंबांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचाही प्रयत्न त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि संकटाच्या काळात आपण त्यांच्या पाठीशी आहोत, हा विश्वास निर्माण करणे हाच या भेटीमागील मुख्य उद्देश होता. सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन माणुसकीचे नाते अधिक दृढ करण्याची संधी असते, ही भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली.

यावेळी शक्तिकेंद्र प्रमुख तथा तालुका महामंत्री रमेश नैताम, मारोती मोटघरे, माजी सरपंच आनंद नैताम, तुळशीदास टिकले, वासुदेव नैताम, माजी पोलीस पाटील रामभाऊ टिकले, अरुण टिकले, रोशन टिकले, बुथ प्रमुख रवि मोहुर्ले, राहुल वाकडे, सतीश टिकले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.