मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 18321 लोकांनी घेतल्या हत्तीरोगाच्या गोळ्या

सामुदायिक औषधोपचार मोहिम सुरू

गडचिरोली : जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ सोमवारी (दि.10) करण्यात आला. कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी आणि मुलचेरा या 7 तालुक्यात हत्तीरोग आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून 100 टक्के पात्र नागरिकांना डी.ई.सी., अल्बेंडाझोल सोबतच आयवरमेक्टीन या गोळ्यांची मात्रा उंची व वयोगटानुसार देण्यात येत आहे. यात पहिल्याच दिवशी 18 हजार 321 नागरिकांना सदर गोळ्या खाऊ घालण्यात आल्या.

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शासकीय विश्रामगृह येथे आमदार मिलिंद नरोटे यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेऊन नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके उपस्थित होते. वडसा येथे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत आमदार रामदास मसराम यांनी सुद्धा हत्तीरोगविरोधी गोळ्या घेऊन नागरिकांना गोळ्या घेण्याचे आवाहन केले. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी हत्तीरोगविरोधी गोळ्या घेऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

7 लाख 22 हजार नागरिक होणार लाभार्थी

मोहिमेदरम्यान पात्र नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्या खाऊ घालण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार 7 तालुक्यातील 7 लाख 22 हजार 423 नागरिकांवर प्रत्यक्ष औषधोपचार करण्यात येत आहे. त्याकरिता ग्राम पातळीवर 3109 कर्मचाऱ्यांची 1565 पथके गठीत करण्यात आली आहेत. त्यांच्या पर्यवेक्षणाकरिता 313 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सोबतच गावपातळीवर मोहिमेकरिता लागणारी औषधे व साहित्य उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले.