कुरखेडा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या “महाडायलिसिस – स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, नगराध्यक्ष अनिता बोरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सिराज पठाण, व्यापारी संघटनेचे विवेक निरंकारी, नगरसेवक अशोक कंगाली, शहर विचार मंचचे जावेद शेख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी डॉ.सिन्हा, डॉ.कटरे, आयपीएचएस समन्वयक प्रवीण गुटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज
नवीन सुरू करण्यात आलेले हे डायलिसिस केंद्र अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असून प्रशिक्षित वैद्यकीय व तांत्रिक कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देण्यात येणार आहे. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी नियमित डायलिसिस ही अत्यावश्यक उपचार पद्धती असल्याने या केंद्रामुळे अशा रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
या केंद्रामुळे कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक स्तरावरच सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, आर्थिक खर्च व हालअपेष्टा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. या केंद्रात ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोफत किंवा परवडणाऱ्या दरात डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.






























