Home पब्लिक प्रॉब्लेम कुरखेडाच्या प्रस्तावित विकास आराखड्याला ‘आप’चा विरोध

कुरखेडाच्या प्रस्तावित विकास आराखड्याला ‘आप’चा विरोध

रद्द करा; अन्यथा जनआंदोलन !

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायत क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन गाव विकास आराखड्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि त्रुटी असल्याचा आरोप करत, हा आराखडा तत्काळ रद्द करण्याची मागणी आम आदमी पार्टी (आप) गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी यांनी सहाय्यक नगररचनाकार यांना निवेदन देऊन 8 दिवसांत भूमिका स्पष्ट न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आराखड्यात नेमके आक्षेप काय?

प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात ‘आप’ने खालील प्रमुख मुद्द्यांवर बोट ठेवले आहे.

खाजगी जागांचे आरक्षण : आराखडा तयार करताना काही खाजगी जागा जाणीवपूर्वक आरक्षित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे.

सेवा रस्ते वगळले : अकृषक (NA) मान्यता असलेले महत्त्वाचे सेवा रस्ते आराखड्यातून गायब करण्यात आले आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक 9 मधील न्यायालयात प्रलंबित असलेला 12 मीटरचा सेवा रस्ताही परस्पर वगळण्यात आला आहे.

अतिक्रमणधारकांना अभय : नगर पंचायतीने यापूर्वी ज्या ठिकाणची अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे केले होते, तेच रस्ते आता नकाशात नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांना एकप्रकारे प्रशासकीय पाठबळ मिळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांचा विरोध : बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित करण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

8 दिवसांचा अल्टिमेटम

हा विकास आराखडा अद्याप शासन स्तरावर मंजूर झालेला नाही. त्यामुळे नगर पंचायतीकडे तो रद्द करण्याची कायदेशीर संधी आहे. जर पुढील 8 दिवसांत प्रशासनाने आपली भूमिका लेखी स्वरूपात स्पष्ट केली नाही, तर बाधित नागरिक आणि शेतकऱ्यांना घेऊन उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नसीर हाशमी यांनी दिला आहे. सदर निवेदन सादर करताना जिल्हा सचिव अमृत मेहेर, शेतकरी उमदेव देशमुख, भास्कर देशमुख आदि उपस्थित होते. या निवेदनामुळे कुरखेडा शहरात विकास आराखड्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.