Home पब्लिक प्रॉब्लेम नगरममध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

नगरममध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

शेतकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा

रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित धर्मरावबाबा आत्राम व इतर पदाधिकारी

सिरोंचा : तालुक्यातील नगरम येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण पांदण रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाची विधिवत सुरुवात करण्यात आली.

सदर रस्ता बदी समय्या यांच्या घरापासून ते नदीच्या टोकापर्यंत बांधण्यात येणार आहे, यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी या रस्त्यामुळे दूर होऊन वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

यावेळी बोलताना आ.आत्राम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री बळीराजा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती दिली जात आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होईल, तसेच शेतीमालाच्या वाहतुकीस चालना मिळून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत या कामास मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेला काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, नगरसेवक सतीश भोगे, सतीश राचर्लावार, व्यापारी सेलचे अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार, जिल्हा महिला उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्ली, रमेश तोटा, सरपंच लक्ष्मण गावडे, सत्यनारायण चिलकामारी यांच्यासह नगरम परिसरातील नागरिक व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.