Home क्राईम ‘क्लास-वन’ दर्जाच्या नोकरीचे आमिष देऊन लाटले 2.16 कोटी

‘क्लास-वन’ दर्जाच्या नोकरीचे आमिष देऊन लाटले 2.16 कोटी

शहीद जवानाच्या मुलाची फसवणूक

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातील अंमलदाराच्या मुलाला अनुकंपा तत्वावर सरकारी सेवेत क्लास-1 अधिकारी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 2 कोटी 16 लाख रुपये लाटून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. पुणे जिल्ह्यातील या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असताना सन 2013 साली तोडगट्टा जंगल परिसरात झालेल्या पोलीस आणि माओवाद्यांमधील चकमकीत पोलीस अंमलदार गणपत नेहरु मडावी हे शहीद झाले होते. शहीद अधिकारी व अंमलदार यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासनाकडून नोकरी देण्यात येत असते. यावरुन शहीद गणपत मडावी यांचा मुलगा सागर गणपत मडावी याने अनुकंपा तत्वावर वर्ग-1 पदासाठी अर्ज सादर केलेला होता.

यादरम्यान सन 2022 साली सागर मडावी हा पुणे येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असताना त्याची ओळख आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे (30 वर्षे, रा.वरोडी खुर्द, ता.भोर, जि.पुणे) या व्यक्तीसोबत झाली. ज्ञानेश्वरला सागर याच्या अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रक्रियेबाबत माहिती मिळाली होती. त्याचा गैरफायदा घेत ज्ञानेश्वरने त्याची मंत्रालयात ओळख असून त्याला अनुकंपा तत्वावरील उप-जिल्हाधिकारी (वर्ग-1) पदाच्या नियुक्तीबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावाने ज्ञानेश्वर वरे याने इतर चार आरोपींच्या मदतीने सागर व त्याची आई मीना गणपत मडावी यांची फसवणूक करुन वेळोवेळी रोख स्वरुपात, फोन-पे वरून, तसेच सागर याच्या बँक खात्याच्या एटीएम मधून एकूण 2 कोटी 16 लाख 79 हजार 100 रुपये घेतले. नोकरीच्या भाबड्या आशेने या माय-लेकाने वडीलांनी कमावून ठेवलेले सर्व गमावले. शहीद कुटुंबाला मिळणारा शासनाच्या निधीपासून स्थावर मालमत्ताही फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात फसून त्यांनी गमावली. पण प्रत्यक्षात नोकरी मात्र मिळालीच नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सागर मडावी याने 20 एप्रिल 2026 रोजीचे गडचिरोली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे आणि त्याच्या चार सहकाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपीच्या ठावठिकाणाची माहिती काढली आणि पोलीस पथकास तातडीने पुणे येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. समाधान दौड व गडचिरोली ठाण्याचे सपोनि.विजय मुसनवार यांच्या नेतृत्वाखाली साक्षीदारांच्या व तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपी ज्ञानेश्वर वरे याला पुणे जिल्ह्यातील रायगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यासोबतच इतर 4 आरोपींचा शोध सुरु असून पुढील तपास सपोनि. विजय मुसनवार करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहा. पोलीस अधीक्षक गडचिरोली अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.