एटापल्ली : तालुक्यातील मेंढरी, गर्देवाडा व वांगेतुरी या ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच मतदानाची प्रक्रिया पार पडून सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीमुळे गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदाधिकाऱ्यांनी युवा नेते तथा अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी राजवाड्यात आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेतली.
धर्मरावबाबा आत्राम यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडी चिन्हाचे दुपट्टे गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले. त्यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























