गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना, तसेच नक्षलवाद्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियमानुसार शासकीय योजनांचा पूर्णपणे लाभ मिळालाच नसल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी येथे पत्रपरिषदेत केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही निदर्शने करत मुख्यमंत्र्यांच्या नावे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. येत्या 5 आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे देण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नक्षलवाद्यांनी गेल्या 40 वर्षात पोलिस खबरी असल्याच्या संशयातून अनेक नागरिकांची हत्या केली. याशिवाय नक्षल्यांच्या हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शहीद व्हावे लागले. त्यांच्या,अर्थात नक्षलपीडित कुटुंबांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून योजना बनविण्यात आली. त्यात वेळोवेळी सुधारणाही झाली. त्यात पीडित कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्याची तरतूद आहे. याशिवाय मदत रक्कम, नक्षल पीडित असल्याचे प्रमाणपत्र, मुलांना मोफत शिक्षण, निवास सुविधा, शेतजमिनीच्या बदल्यात सुरक्षित ठिकाणी शेतजमीन, व्यवसाय थाटण्यासाठी सुरक्षित ठिकाणी दुकान अशा अनेक प्रकारच्या लाभांचा योजनेत समावेश आहे. परंतू त्यातील अनेक लाभ मिळालाच नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला.
यापूर्वीही अनेक वेळा या विषयावर लेखी आणि तोंडी निवेदन देऊनही फरक पडला नाही. त्यामुळे 5 आॅगस्टपासून बेमुदत धरणे देणार असल्याचे या कुटुंबियांनी सांगितले.