Home पब्लिक प्रॉब्लेम इंधन टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाची कंपन्यांना सूचना

इंधन टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाची कंपन्यांना सूचना

पुरवठ्यासाठी खासगी टँकरचा वापर करा

आरमोरी : जिल्ह्यातील पेट्रोलपंप धारकांना इंडियन आॅईल कंपनीकडून इंधनाचा नियमित व सुरळीत पुरवठा केला जात नसल्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. टँकरच्या कमतरतेमुळे पुरवठा सुरळीत होत नसल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. अशा स्थितीत काही पेट्रोल पंपधारकांकडे असलेल्या टँकरचा तात्पुरत्या स्वरूपात वापर करण्यास परवानगी दिल्यास इंधनाची टंचाई कमी होऊ शकते, अशी सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इंडियन आॅईल कंपनीला केली आहे.

सध्या जिल्ह्यात शेतीची कामे सुरू झाली आहेत. मशागतीसाठी ट्रॅक्टरची गरज शेतकऱ्यांना भासत आहे. तसेच तलाव खोलीकरणाच्या कामावरील यंत्र सामुग्रीसाठी (ट्रॅक्टर, हॅार्वेस्टर, डिझेल पंप, जेसीबी) डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. परंतू योग्य प्रमाणात इंधन पुरवठा होत नसल्याने शेतकरी व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत पेट्रोल पंप धारकांना स्वत:च्या मालकीचे टँकर तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे.

डिझेलचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद ठेवावे लागत आहे. त्याचा शेतकऱ्यांसह सर्वांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या स्थितीबद्दल पेट्रोलपंप धारकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यावर उपाय सूचविला. आता इंडियन आॅईल कंपनीकडून दखल घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.