सिरोंचा : नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे बुजविण्यात येत नसल्याने जेष्ठ नागरिकांना, महिलांना आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय दोनचाकी व चारचाकी वाहन चालवणार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या त्रासातून नगरवासियांना मुक्त करा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका करुणा जोशी यांनी केली आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना गावातल्या गावात फेरफटका मारणेसुद्धा कठीण झाले आहे. भाजीपाला मार्केट व इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी बाजारपेठेत येणारे, कार्यालयीन कामासाठी येणार्या लोकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ हे खड्डे बुजविण्यात यावे. अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही करुणा जोशी यांनी दिला आहे.