गडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम गर्देवाड्यात पोलिसांनी आपले मदत केंद्र उभारून जेमतेम 9 महिने झाले असताना या भागातील नागरिकांच्या विकासाची दारे उघडी केली आहेत. या भागातील नागरिकांनी आतापर्यंत गावात एसटी बस पाहिली नव्हती. पण ताडगुडा येथील पुलाचे आणि रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण करून या भागात पहिल्यांचा एसटी बस पोहोचवण्यात प्रशासनाला यश आले. गर्देवाडा ते अहेरी अशी बसफेरी आता सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील 12 गावांमधील नागरिकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.
नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अतिसंवेदनशील गर्देवाडा येथे दि. 15 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासून तेथील परिसरातील नागरिकांना गडचिरोली पोलीस दलामार्फत विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि.22 सप्टेंबर रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी पहिली एस.टी. बससेवा सुरु करण्यात आली.
पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपूर्वी गर्देवाडा येथून एटापल्ली ते अहेरी आणि इतर मोठया गावांना जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नव्हता. गट्टा (जां) ते वांगेतुरी दरम्यान असलेला ताडगुडा येथील पुल देखील सुस्थितीत नसल्याने गर्देवाडा परिसरातील 12 गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुराव्याने ताडगुडा येथील पुलाचे, तसेच रस्त्याचे बांधकाम युद्धस्तरावर पुर्ण करण्यात आल्याने आता महामंडळाची एसटी बसही गावात पोहोचू शकते.
गावातील महिलांच्या हस्ते पुजन
एसटी बसची सुरूवात करताना गावातील महिलांच्या हस्ते बसचे पुजन करुन ही बससेवा सुरु करण्यात आली. यावेळी एसटीचे चालक रामू कोलमेडवार व वाहक गणेश गोपतवार यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळीबसचे वाहक गणेश गोपतवार यांनी नागरिकांना बसच्या प्रवासाचे टप्पे, बस तिकीटाचे दर इ.बाबत विस्तृत माहिती दिली. या बसमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी, बँकेची व ईतर शासकिय कामे विनाविलंब करण्यासाठी मोठी मदत होईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे व महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे आभार मानले.
हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सीआरपीएफचे असिस्टंट कमाण्डंट संतोष डरांगे, पो.नि.जितेंद्र, पोमकें गर्देवाडा येथील प्रभारी अधिकारी पोउपनि. धनाजी शिंदे, पोउपनि.संग्राम अहिरे, एसआरपीएफचे पोउपनि. देवकुळे तसेच पोलीस अंमलदार आणि गर्देवाडा येथील 100 ते 120 नागरिक उपस्थित होते.