आष्टीत भाड्याने राहणाऱ्या दिव्यांग वृ्द्धाची गळा चिरून रहस्यमय हत्या

संशयित तरुणांना घेतले ताब्यात

गडचिरोली : मुळच्या बुटीबोरी (नागपूर) येथील रहिवासी पण अनेक वर्षापासून चामोर्शी तालुक्यातल्या आष्टीत राहात असलेले रशिद अहमद शेख (60 वर्ष) या वृद्धाची त्यांच्या खोलीतच गळा चिरून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपी बाहेरून कुलूप लावून पसार झाले होते. त्यामुळे दोन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी काही संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली.

रशिद शेख हे पायाने दिव्यांग होते. आष्टीत ते एकटेच भाड्याच्या खोलीत राहात होते. अधूनमधून ते मूळ गावी बुटीबोरीला जात होते. ही घटना उघडकीस येण्याच्या तीन दिवसांपूर्वी (दि.12) त्यांनी नातेवाईकांना गावाकडे येत असल्याचे सांगितले होते. पण ते आले नसल्याने नातेवाईकांनी फोनवरून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोन कॅाल उचलल्या जात नव्हता. त्यामुळे नातेवाईकांना शंका आल्याने त्यांनी आष्टी गाठले. बाहेरून कुलूप लावलेले असल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता रशिद शेख रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या गळा आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.

आष्टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा उलगडा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. रशिद शेख यांची पार्श्वभूमी पाहता आणि संशयाच्या आधारावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे लवकरच या हत्येचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.