गडचिरोली : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये चार दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांपैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. हे तीनही अपघात दि.28 ला घडले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील कुलकुली गावाजवळ रात्री 8 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात एका दुचाकीवर आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथील रहिवासी जितेंद्र बाळकृष्ण मेश्राम (35 वर्ष) आणि त्यांची आई निर्मला मेश्राम (60 वर्ष) हे मुरमाडी येथील कार्यक्रम आटोपून आपल्या गावी परत जात होते. त्याचवेळी मांगदावरून कुलकुलीकडे जाणारे दिंडेश्वर पुरूषोत्तम मसराम (30 वर्ष) आणि दिनेश मसराम (28 वर्ष) यांच्या दुचाकीसोबत त्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत दिंडेश्वर मसराम यांचा जागीच मृत्यू झाला, तर जितेंद्र मेश्राम यांना रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. इतर दोघे जखमी झाले.
पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
धानोरा तालुक्यातील चातगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले ज्ञानेश्वर वासुदेव मडावी हे रात्री आपल्या दुचाकीने चामोर्शीवरून गडचिरोलीकडे येत होते. चामोर्शी तालुक्यातील कुरूळ जवळच्या वळणावर मालवाहू टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मडावी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तिसरा अपघात आरमोरी ते देसाईगंज मार्गावर घडला. यात शिवाजी सखा डिवरे (रा.ब्रह्मपुरी) हे सेवानिवृत्त शिक्षक दुचाकीने आरमोरीवरून देसाईगंजकडे जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. आरमोरी पोलिसांना तो ट्रक पकडण्यात यश आले, मात्र ट्रकचालक पोलिसांच्या हाती लागला नाही.
































