Home दैनंदिन बातम्या जिल्हा रुग्णालयात यशस्वीरित्या केल्या गुंतागुंतीच्या ट्युमर शस्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात यशस्वीरित्या केल्या गुंतागुंतीच्या ट्युमर शस्रक्रिया

आता गडचिरोलीत दर्जेदार उपचार

गडचिरोली : मोठ्या शस्रक्रियांसाठी आता नागपूर किंवा इतर मोठ्या शहरात रुग्णांना पाठवण्याची प्रथा मोडीत काढत जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक अशा अंडाशयाच्या गाठींच्या शस्रक्रिया यशस्वीरित्या करून वैद्यकीय पथकाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. गडचिरोलीत आता उच्च दर्जाचे उपचार मोफत व खात्रीशीर मिळत असल्याचे ही बाब जिल्ह्यातील रुणांसाठी दिलासादायक ठरली आहे.

65 वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

​जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटात अंडाशयाची मोठी गाठ (Ovarian Tumor) असल्याचे निदान झाले होते. रुग्णाचे वय आणि गाठीची जटिलता पाहता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. ​स्त्रीरोग तज्ज्ञ तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये त्यांना डॉ.आकाश, डॉ.शरद आणि डॉ.मानसी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शस्त्रक्रियेदरम्यान महत्त्वाची असणारी भूल देण्याची जबाबदारी भूलतज्ज्ञ डॉ.मित्तल आणि डॉ.सुकेशनी यांनी चोख बजावली. तसेच, ऑपरेशन थिएटर इन्चार्ज माधुरी गेडाम व किरण सिस्टर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून प्रकृती वेगाने सुधारत आहे.

26 वर्षीय तरुणीच्या दुर्मिळ कॅन्सरयुक्त गाठीवर यशस्वी मात

ग्रामीण रुग्णालय धानोरा येथून संदर्भित झालेल्या एका 26 वर्षीय तरुण महिला रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत क्लिष्ट असणारी शस्त्रक्रिया केली. या महिला रुग्णाच्या पोटात प्रचंड दुखत होते आणि साधारण 24 आठवड्यांच्या गर्भावस्थेएवढी मोठी गाठ पोटाला जाणवत होती. सीटी स्कॅन (CT-scan) आणि सोनोग्राफी (USG) चाचणीत तिच्या उजव्या अंडाशयामध्ये घन आणि द्रवरूप मिश्रित मोठी गाठ असल्याचे समोर आले होते. सुरुवातीला ‘ट्युबो-ओव्हेरियन ॲब्सेस’ असण्याची शंका देखील व्यक्त केली जात होती.

​परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय पथकाने तात्काळ निर्णय घेत ‘एक्स्प्लोरेटरी लॅप्रोटोमी आणि उजवे अंडाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया’ यशस्वीरीत्या पार पाडली. ही शस्त्रक्रिया मुख्य शल्यचिकित्सक डॉ.मयुर दुधे, प्रथम सहाय्यक डॉ.कृणाल चेंदकापुरे, द्वितीय सहाय्यक सुमेध कांबळे, तृतीय सहाय्यक प्रियांका मडावी आणि भूलतज्ज्ञ डॉ.अंकिता भावते यांच्या पथकाने केली.

शस्त्रक्रियेनंतर गाठीचा तपासणी अहवाल आला असून, त्यामध्ये हा एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर ‘मिक्स्ड जर्म सेल ट्युमर’ असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे या कॅन्सरयुक्त गाठीला शरीरातून वेळेत पूर्णपणे बाहेर काढण्यात यश आले असून रुग्णाचे प्राण वाचले आहेत.

सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा

​आरोग्य मंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे गडचिरोली आणि परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अगदी मोफत आणि यशस्वीपणे केल्या जात आहेत.