Home राजकीय घडामोडी गडचिरोलीतील प्रभाग 9-अ मध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

गडचिरोलीतील प्रभाग 9-अ मध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

18 मे पासून नामांकनाला सुरूवात

गडचिरोली : नगर परिषदेच्या प्रभाग क्रमाक 9-अ चे नगरसेवक आणि स्वच्छता समितीचे सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. येत्या 18 मे पासून त्यासाठी नामांकन भरण्यास सुरूवात होईल. तर प्रत्यक्ष मतदान 20 जूनला होणार आहे.

ओबीसी प्रवर्गासाठी राखिव असलेल्या या जागेवर आपल्या पक्षाचा प्रतिनिधी निवडून पाठवण्यासाठी प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात काही अपक्षही नशिब आजमावण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने इतर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यात गडचिरोली नगर पालिकेतील या महत्त्वाच्या जागेची निवडणूक होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 18 ते 25 मे 2026 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 26 मे रोजी अर्जांची छाननी होऊन 27 मे ते 2 जून दरम्यान उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. आवश्यक असल्यास 20 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. 21 जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल.

या निवडणुकीच्या घोषणेनंतर गडचिरोली शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य नावांवर चर्चा सुरू झाली आहे. ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेकांना पक्षाची अधिकृत तिकीट मिळण्याची आशा आहे.