Home क्राईम छत्तीसगड सीमेवरील जंगलात सापडला पुन्हा एक शस्र कारखाना

छत्तीसगड सीमेवरील जंगलात सापडला पुन्हा एक शस्र कारखाना

माओवाद्यांची पाळेमुळे होताहेत नष्ट

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’अंतर्गत आठवडाभरात पुन्हा एक शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. गडचिरोली पोलीस आणि छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या कारवाईत पाच वेगवेगळ्या बंदुकांसह 18 जीवंत काडतूसं, स्फोटकं आणि इतर बरेच साहित्य पोलिसांच्या हाती लागले. हे सर्व साहित्य जंगलात जमिनीखाली लपवून ठेवले होते हे विशेष.

माओवाद्यांनी छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलांना धोका पोहोचविण्यासाठी, तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारची शस्त्रे आणि स्फोटक साहित्य लपवून ठेवले होते. दुर्गम जंगलाचा फायदा घेत माओवाद्यांकडून त्या ठिकाणी हिंसक कारवायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांस्त्रांची निर्मिती केली जात होती. यापूर्वी 23 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईतही अशाच पद्धतीचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर पुन्हा आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या टिपनुसार 27 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईत नारायणपूर जिल्ह्यातल्या काकूर पोलीस स्टेशनपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर हे साहित्य पोलिसांना आढळले.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराज्यीय अभियान राबविण्यात आले. त्यात विशेष अभियान पथक प्राणहिता येथील 4 तुकड्या, डीआरजी नारायणपूरचे 1 पथक आणि प्राणहिता येथील 2 बॅाम्ब शोधक-नाशक पथकाने प्रत्यक्ष सहभाग घेऊन सीमावर्ती भागातील जंगल पिंजून काढले. या कारवाईत जमिनीखाली लपवून ठेवलेल्या बंदुका व काडतुसांसह क्लेमोर, डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, 500 पेक्षा अधिक बिजीएल सेल व बिजीएल सेल बनविण्याचे साहित्य, 7 नग बिजीएल लाँचर, 3 नग ट्युब लाँचर, लोखंडी सळाखी, तसेच शस्त्रनिर्मितीसाठी लागणाऱ्या 2 लेथ मशीन, 2 मोटर, ग्राईंडर मशीन, इन्व्हर्टर व बॅटरी, वायर बंडल, सोलर प्लेट असे शस्त्र व शस्त्रनिर्मिती साहित्य हस्तगत करण्यात यश आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले शस्त्रनिर्मितीचे माओवादी साहित्य पथकातील जवानांकडून जागीच नष्ट करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, पोलीस उपअधीक्षक (नारायणपूर) मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.