गडचिरोली : बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून एका अल्पवयीन युवकाने त्याच्या मित्राची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात घडली. बादल नकटुजी कोसनकर (17 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या मारेकरी मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
आरोपी आणि मारेकरी हे दोघेही मित्र होते. मात्र तीन दिवसांपूर्वी मृत बादल याने आरोपीच्या बहिणीबद्दल आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केल्याने आरोपी युवकाला राग आला होता. पण त्याने उघडपणे तो राग प्रकट न करता बादलचा काटा काढण्याची योजना आखली. त्यासाठी त्याला गांजा ओढण्यासाठी जाऊ, असे आमिष दाखवून बुधवारी दुपारी गुरवळा मार्गावरील जंगलात नेले. तिथे पोहोचल्यानंतर परिसरात कोणीही नसल्याची खात्री करून बादलवर मागून कुऱ्हाडीने हल्ला केला. पाठीवर आणि डोक्यावर वार केल्याने बादल रक्तबंबाळ होऊन तिथेच कोसळला.
दुसऱ्यांनीच खून केल्याचा बनाव
आपला हेतू साध्य झाल्यानंतर आरोपी युवकाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वत:च तक्रार देण्यासाठी पुढे येऊन बादलचा पैशाच्या देवाण-घेवाणीतून तीन अनोळखी लोकांनी खून केल्याचे पोलिसांना सांगितले. पण जबाबातील विसंगती पाहून पोलिसांना संशय आला. घटनास्थळी पंचनामा करून दोघांचेही मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांनी फिर्यादी बनून आलेल्या युवकाला बोलते केले. अखेर त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली. गडचिरोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रवीण बुंदे करीत आहे.
































