आरमोरी : गडचिरोली शहरातून काही दिवसांपूर्वी चोरी गेलेल्या सोन्यातील 18 तोळे सोने आरमोरीतील एका नामांकित सराफा व्यावसायिकाने खरेदी केल्याच्या चर्चेला आरमोरीत उधान आले आहे. मात्र आरमोरी पोलिसांनी यासंदर्भात चुप्पी साधल्याने या गौडबंगालातील संशयाचे धुके आणखीच दाट झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून रक्षकांनीच भक्षक बनण्याचा प्रकार हाणून पाडावा अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीतील या चोरीत 27 तोळे सोने चोरी गेले होते. एका 14 वर्षीय अल्पवयीन बालकाने आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील एका युवकाच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरमोरी पोलिसांनी त्या आरोपींची चौकशी केली, त्यात सोने कुठे विकले याची कबुलीही दिल्याचे सांगितले जाते. त्यानुसार आरमोरीतील त्या सराफा व्यावसायिकाला ठाण्यात बोलवून गुप्त चर्चा करण्यात आली. पण चोरीचे सोने खरेदी करणे गुन्हा असताना आरमोरी पोलिसांनी सराफा व्यावसायिकावर कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वास्तविक ग्राहकाकडील सोने खरेदी करताना सराफा व्यावसायिकाने खरेदीचे बिल किंवा इतर कोणत्याची आवश्यक गोष्टींची तपासणी न करता कमी दरात ते सोने खरेदी केल्याची कुजबूज सुरू आहे. याप्रकरणी आरमोरी ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.निरीक्षक कैलास गवते यांच्याकडून वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन कॅाल किंवा मॅसेजला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काहीतरी तपविण्याचा प्रयत्न आरमोरी पोलिसांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.
































