गडचिरोली : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांकडे आता पोलिसांनी लक्ष केंद्रित करत कोरची तालुक्यातील छत्तीसगड सीमेकडील भागात आणखी एका मोठ्या जुगारावर धाड टाकली. मात्र 22 कार आणि 6 दुचाकी वाहनांनी आलेल्या 31 जुगाऱ्यांकडे पोलिसांना फक्त 75 हजार रुपयांची रक्कम आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लाखो रुपयांचा खेळ चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर एवढी कमी रक्कम सापडल्यामुळे बाकी रक्कम कुठे गायब झाली? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश बसविण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी अवैध व्यवसाय व जुगार इत्यादींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर कोरची तालुक्यातील पोलीस मदत केंद्र बेडगावच्या पथकाने त्या भागातील मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा मारला.
बेडगाव जवळील आंतरराज्यीय सिमेलगत असलेल्या गहाणेगाळा जंगल परिसरात हा जुगार अड्डा सुरू होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बेडगावचे पोउपनि.दिनेश खोटेले व पोलीस पथकाने दोन पंचांसह जंगल परीसरातील त्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच 6 जुगारी पसार झाले.
यावेळी घटनास्थळावर जुगार खेळणारे शैलेंद्रकुमार साहू (26 वर्षे), रा.बेलारगोंदी, जि.राजनांदगाव (छ.ग.), मोहम्मद बसीर, (48 वर्षे), रा.राजनांदगाव यांच्यासह एकूण 29 आरोपी, तसेच जुगार साहित्य आणि रोख 75 हजार 10 रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. हा जुगार अड्डा छत्रपती बांगरे, रा.कोरची, अमजतखॉ पठाण, तालीब, रा.डोंगरगड, राजा बाँड ऊर्फ राजा श्रीवास, रा.राजनांदगाव, हेमंत राजपुत रा.राजनांदगाव यांच्याकडून चालविला जात होता. इतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत.
या कारवाईत 22 चारचाकी वाहने, 6 दुचाकी वाहने, 26 मोबाईल फोन, जुगार खेळण्याचे पत्ते असा एकूण 1 कोटी 34 लाख 14 हजार 10 रुपये किंमतीच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पोलिसांची चाहूल लागल्यानंतर पसार झालेल्या आरोपींमध्ये सोनु कांबळे, रा.दुर्ग, इम्रान शेख, रा.डोंगरगाव, बबलु खाटीक, रा.भिलाई, रोहीत शाहु, रा.राजनांदगाव, बसंत सोनी, रा.दुर्ग व अबुल वर्मा रा.राजनांदगाव यांचा समावेश आहे. पुढील तपास पोउपनि.दिनेश खोटेले हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली एम.रमेश यांच्या आदेशान्वये, उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) प्रमोद मडामे तसेच कोरचीचे पोनि.दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगावचे पोउपनि. दिनेश खोटेले, अंमलदार विकास शेंडे, अनिल मडावी, सचिन येलमुलवार, मिथुन रासेकर, उमेशकुमार बन्सोड यांनी केली.
































