नक्षलवादाला मुळापासून उखडण्यासाठी सीआरपीएफ महासंचालकांकडून टिप्स

192 बटालियनच्या जवानांचे केले कौतुक

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक सुजॅाय लाल थाऊसेन यांनी शुक्रवार दि.२८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत सीआरपीएफच्या गडचिरोली येथील 192 बटालियन मुख्यालयाला त्यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नक्षलवादाला मुळासकट उखडून टाकण्यासाठी नक्षलप्रभावित क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रीत करण्याची सूचना त्यांनी केली.

192 बटालियनच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम क्वार्टर गार्डवर त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जवानांचा भोजन कक्ष, मनोरंजन कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांनी किचनमध्ये तैनात असलेल्या आणि भोजनालयातील कर्मचाऱ्यांशीही वार्तालाप करून त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्यांनी 192 बटालियन आणि सर्व कंपन्यांद्वारा विपरित परिस्थितीमध्येही नक्षलविरोधी अभियानात केल्या जात असलेल्या ड्युटीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे कौतुक केले.

यावेळी महासंचालक थाऊसेन यांनी एमआयडीसी परिसरातील पी.आय.ट्रेनिंग सेंटरला भेट दिली. यादरम्यान सीआरपीएफचे अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीसच्या अधिकाऱ्यांसोबतही नक्षलविरोधी अभियानाबद्दल तसेच सद्यस्थितीत दक्षिण गडचिरोली आणि छत्तीसगडमधील जवानांच्या तैनातीचा आढावा घेऊन चर्चा केली. त्यांनी काही सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.

महासंचालकांच्या या भेटीदरम्यान सीआरपीएफचे अपर पोलीस महासंचालक (दक्षिण झोन) रविदीपसिंह शाही, पोलीस महानिरीक्षक पी.एस.रणपिसे (पश्चिम विभाग), उपमहानिरीक्षक अजयकुमार सिंह, गडचिरोली रेंजचे उपमहानिरीक्षक जगदीश नारायण मीणा, 192 बटालियनचे कमांडंट देव राज, द्वितीय कमान अधिकारी नरेन्द्र कुमार, तसेच बटालियनचे इतर अधिकारी उपस्थित होते.