Home दैनंदिन बातम्या वसा जवळच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात मजुराने गमावला जीव

वसा जवळच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात मजुराने गमावला जीव

आ.डॅा.नरोटे यांनी केले सांत्वन

गडचिरोली : तालुक्यातील वसा गावाजवळच्या जंगलात भाजीसाठी मशरूम शोधण्यासाठी गेलेल्या बाळू विठ्ठल राऊत (45 वर्ष) यांच्यावर वाघाने हल्ला करत त्यांना ठार केले. ही घटना बुधवारी घडली. मात्र गुरूवारी (दि.24) या घटनेचा उलगडा झाला. वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आमदार डॅा.मिलींद नरोटे यांनी वसा येथे जाऊन राऊत यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

बाळू राऊत बुधवारी मशरूम गोळा करण्यासाठी गावाजवळच्या जंगलात गेले होते. पण रात्रीपर्यंत ते घरी परत आले नाही. त्यांचा मोबाईलसुद्धा बंद अवस्थेत होता. त्यामुळे कुटुंबियांनी चिंतेतच कशीबशी रात्र काढली. गुरूवार सकाळी गावातील नागरिक जंगलाचा परिसर पिंजून काढत असताना त्यांना बाळू राऊत यांचा मृतदेह सापडला. वाघाने त्यांचे शरीराचे अवयव वेगळे केले होते.

वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी वाघाचे ठसे असल्याचे नोंदविले. त्यामुळे राऊत यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यातच झाल्याचे वनअधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच आ.डॅा.मिलींद नरोटे यांनी वसा येथे जाऊन राऊत कुटुंबियांची भेट घेऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. वाघाचे अस्तित्व पाहता जंगलात कोणीही एकटे जाऊ नका, अशी सूचनाही त्यांनी केली.