Home दैनंदिन बातम्या गडचिरोली एसटी विभागाला मिळाले ‘जिजाऊ’चे बळ, 30 बसेस दाखल

गडचिरोली एसटी विभागाला मिळाले ‘जिजाऊ’चे बळ, 30 बसेस दाखल

आणखी 10 नवीन गाड्या मिळणार

गडचिरोली : सर्वसामान्यांच्या हक्काची परिवहन सेवा म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक बसगाड्यांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे महामंडळाची बससेवा अधिक सक्षम, सुलभ आणि आरामदायी करण्यासाठी नव्याकोऱ्या राजमाता ‘जिजाऊ’ बसेसचा ताफा दोन टप्प्यात गडचिरोली विभागाला मिळाला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 10 आणि दुसऱ्या टप्प्यात 20 गाड्या दाखल झाल्या आहेत. आणखी 10 गाड्या मिळणार आहेत.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गडचिरोली जिल्ह्याच्या एसटी वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी 54 आसनी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दुर्गम, आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एसटी ही केवळ प्रवासाचे साधन नसून विद्यार्थी, कामगार, शेतकरी, आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे. त्यामुळे या भागातील एसटी सेवा अधिक सुरक्षित, सक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी शासन व एसटी महामंडळाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

“गडचिरोलीतील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणे ही आमची जबाबदारी आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर जुन्या बसेसवरील अवलंबित्व कमी करून नवीन बसेस उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार 20 ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, लवकरच आणखी 10 नवीन बसेस गडचिरोलीच्या एसटी ताफ्यात दाखल करण्यात येतील,” असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

कोणत्या आगाराला किती बसेस?

महिनाभरापूर्वी पहिल्या टप्प्यात मिळालेल्या 10 बसेसपैकी 5 गडचिरोली आगाराला तर 5 गाड्या गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी आगाराला देण्यात आल्या होत्या. आता मिळालेल्या 20 पैकी 10 गडचिरोली, 5 अहेरी आणि 5 ब्रह्मपुरी आगाराला देण्यात आल्या आहेत.

नवीन बसेसमुळे गडचिरोली जिल्ह्यातील विविध मार्गांवरील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, नियमित आणि दर्जेदार एसटी सेवा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.