गडचिरोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान 2.0 (2026)’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दि.23 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात आयोजित 650 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 48 हजार 296 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान पुढील उपचारांची आवश्यकता आढळलेल्या 506 रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले.
मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 सप्टेंबरपासून हे अभियान राबविण्यात आले. ग्रामीण, शहरी तसेच दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरात आरोग्य तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, आवश्यक तपासण्या व औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत देखील या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या समन्वयातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.
48 हजार 296 नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ
या अभियानांतर्गत दि.23 सप्टेंबरपर्यंत एकूण 650 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये 20 हजार 903 पुरुष, 21 हजार 303 महिला आणि 6 हजार 90 बालके अशा एकूण 48 हजार 296 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरांमध्ये विविध आजारांच्या निदानासाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. कायचिकित्सा विभागांतर्गत 12 हजार 242, बालरोग विभागात 3 हजार 693, स्त्रीरोग विभागात 3 हजार 78, नेत्रविकार विभागात 2 हजार 331, अस्थिरोग विभागात 1 हजार 977, त्वचारोग विभागात 1 हजार 925, कान-नाक-घसा विभागात 1 हजार 196 आणि शल्यचिकित्सा विभागात 843 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हृदयविकारासंदर्भात 1 हजार 104 नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर इतर आजार व व्याधींसाठी 3 हजार 997 नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यात आली.
10 हजार 894 रक्त तपासण्या; 1 हजार 203 ईसीजी
रोगनिदानासाठी आवश्यक तपासण्यांवरही अभियानात विशेष भर देण्यात आला. एकूण 10 हजार 894 नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली, तर आवश्यकता आढळलेल्या 1 हजार 203 नागरिकांची ईसीजी तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसोबत रक्तदानाविषयीही जनजागृती करण्यात आली. विविध शिबिरांच्या माध्यमातून 690 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
आभा आणि आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी
नागरिकांना शासकीय आरोग्य सुविधांशी जोडण्यासाठी अभियानादरम्यान विशेष नोंदणी करण्यात आली. त्याअंतर्गत 2 हजार 32 नागरिकांची ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करण्यात आली, तर 1 हजार 882 नागरिकांची आयुष्मान भारत अंतर्गत ‘गोल्डन कार्ड’साठी नोंदणी पूर्ण करण्यात आली.
506 रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित
शिबिरांमध्ये केवळ प्राथमिक तपासणी न करता आजाराचे निदान झाल्यानंतर आवश्यक रुग्णांना पुढील उपचार व्यवस्थेशी जोडण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार पुढील अथवा उच्चस्तरीय उपचारांची आवश्यकता आढळलेल्या 506 रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. यापैकी 53 रुग्णांना अँजिओग्राफी व आवश्यक विशेष तपासण्यांसाठी पाठविण्यात आले आहे.
85 नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा नोंदविली
अभियानाच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या आवाहनाला प्रतिसाद देत 85 नागरिकांनी अवयवदानासाठी प्रतिज्ञा नोंदविली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. सर्वसामान्य व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरात मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना आवश्यक पुढील उपचारांशी जोडणे हा प्रशासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान देणारे गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संस्था, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचे कौतुक केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले की, शिबिरांमध्ये गंभीर आजारांचे निदान झालेल्या पात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून आवश्यक उपचारांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
































