
गडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या “चला शाळेला जाऊ या” या विशेष उपक्रमांतर्गत नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दोन दिवस गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून दुर्गम भागातील काही शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती व पायाभूत सुविधांची त्यांनी पाहणी केली.
शाळांना प्रत्यक्ष भेटी व पाहणी
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, दि.22 रोजी उपसंचालक माधुरी सावरकर यांनी मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर, आष्टी यासह परिसरातील काही शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी थेट वर्गखोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचे वाचन, लेखन व गणितीय कौशल्य तपासले. तसेच शालेय पोषण आहार, उपस्थितीचे प्रमाण, डिजिटल शिक्षण व शालेय परिसरातील भौतिक सुविधांची तपासणी करत संबंधितांना आवश्यक सुधारणांचे निर्देश दिले.
कस्तुरबा गांधी विद्यालयाची पाहणी
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, दि.23 रोजी सावरकर यांनी अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील ‘कस्तुरबा गांधी बालिका विद्यालया’स (KGBV) भेट देऊन पाहणी केली. तेथील विद्यार्थिनींची शैक्षणिक गुणवत्ता, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था व सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला.
5 तालुक्यांची शैक्षणिक आढावा सभा
नागेपल्ली (आलापल्ली) येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय शैक्षणिक आढावा सभा पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजागरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) गडचिरोलीचे प्राचार्य चापले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती आणि सर्व व्यवस्थापनांच्या (आश्रमशाळा व कॉन्व्हेंटसह) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपसंचालकांचे मार्गदर्शन
या आढावा सभेत शिक्षण उपसंचालक सावरकर यांनी पाचही तालुक्यांतील शैक्षणिक प्रगती, 100 टक्के पटनोंदणी, गळती रोखणे आणि शासनाच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेतला. “दुर्गम व आदिवासी भागातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणे हेच आपले मुख्य ध्येय असून संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणा व मुख्याध्यापकांनी समन्वयाने व सक्रियतेने कार्य करावे,” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
या महत्त्वाच्या दौऱ्यामुळे व आढावा बैठकीमुळे दक्षिण गडचिरोली परिसरातील शैक्षणिक वर्तुळात नवा उत्साह निर्माण झाला आहे.
































