Home दैनंदिन बातम्या रिमझिम पावसात वाजतगाजत गणपती बाप्पाला दिला निरोप

रिमझिम पावसात वाजतगाजत गणपती बाप्पाला दिला निरोप

रात्री उशिरापर्यंत चालल्या मिरवणुका

गडचिरोली : ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’ असा गजर करत जिल्हाभर गणपत्ती बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यात आला. गडचिरोली शहरात मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकांना संध्याकाळी सुरूवात झाली. विशेष म्हणजे रिमझिम पाऊस सुरू असतानाही विसर्जन मिरवणुकांमधील उत्साह कमी झालेला नव्हता. रात्री उशिरापर्यंत मोठ्या उत्साहात मिरवणुका सुरू होत्या.

दिवसभर सुरू असलेला रिमझिम पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत काही मंडळांच्या मिरवणुकांना उशिरा सुरूवात झाली. मिरवणुकांमधील उत्साह कमी होतो की काय, अशी परीक्षाच जणूकाही वरुणराजा पहात होता. पण पावसाची तमा न बाळगता मिरवणुका तेवढ्याच उत्साहाच्या वातावरणात मार्गक्रमण करत निघाल्या.

पावसापासून बचावासाठी वाहनावर विराजमान बाप्पाच्या मूर्तींना पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणाने झाकण्यात आले होते. मिरवणुकांमधील विविध देखावे, नृत्य पाहण्यासाठी आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक छत्र्या घेऊन रस्त्याच्या दुतर्फा आणि इंदिरा गांधी चौकात जमले होते.

ढोलताशांच्या गजरासोबत काही मंडळांनी डीजेचाही वापर केला. पण आवाजाची मर्यादा दरवर्षीपेक्षा कमी होती. याशिवाय रिमझिम पावसातही आतिषबाजी केली जात होती. गोकुळनगर तलावावर विसर्जनासाठी प्रकाश व्यवस्थेसह तलावात बॅरिकेटिंग करून सुरक्षेची खबरदारी नगर परिषदेकडून घेण्यात आली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वेगवेगळ्या भागात विसर्जन मिरवणुका निघाल्याने पोलीस यंत्रणेवर काहीसा ताण होता. मात्र अंगावर रेनकोट लावून पोलिसांनी आपले कर्तव्य व्यवस्थित बजावले.