Home दैनंदिन बातम्या भामरागड पुन्हा झाले जलमय; 250 घरांमध्ये शिरले पुराचे पाणी

भामरागड पुन्हा झाले जलमय; 250 घरांमध्ये शिरले पुराचे पाणी

2 गंभीर रुग्णांना मोटारबोटने हलविले

गंभीर रुग्णांना पुराच्या पाण्यातून घेऊन जाताना एसडीआरएफची चमू

भामरागड : छत्तीसगडमधून वाहत येणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुरामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा भामरागडला पाण्याचा वेढा पडला. संध्याकाळपर्यंत पाणी वाढत जाऊन गावात शिरल्याने प्रशासनाने 525 लोकांना निवारागृहात हलविले. 250 घरे जलमय झाली आहेत. दरम्यान दोन गंभीर रुग्णांना एसडीआरएफच्या मदतीने मोटारबोटने पर्लकोटा नदीच्या पुरातून हेमलकसा आणि नंतर अहेरीला हलविण्यात आले.

शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास पर्लकोटावरील पूल पाण्याखाली गेला. पाऊस रिमझिम असला तरी पुराचे पाणी वाढतच होते. संध्याकाळी मार्केट चौकापर्यंत पाणी आल्याने प्रशासनाने आधीच सतर्क केलेल्या व्यापारी आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी सामान हलवले. प्रशासनाने 525 लोकांना सुरक्षित स्थळी आश्रय दिल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले. आज सकाळपर्यंत 250 घरे जलमय झाली आहेत.

दरम्यान गंभीर आजारी असलेल्या दोन रुग्णांना तालुका प्रशासनाच्या सूचनेवरून एसडीआरएफच्या पथकाने मोटारबोटने पर्लकोटा नदीचा पूर पार करून हेमलकसा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेने त्या रुग्णांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेऊन भरती करण्यात आले. होडरी येथील सैतू हबका (65 वर्ष) यांना रक्तस्राव व अ‍ॅब्सेसच्या उपचारासाठी तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. तसेच कुक्कामेटा येथील मालू पिडो वड्डे (53 वर्ष) हे बेशुद्ध व प्रतिसाद न देण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

छत्तीसगड भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पर्लकोटा, पामुलगौतम नद्यांना पूर आला आहे. भामरागडसह लाहेरी मार्गही बंद आहे. त्यामुळे 63 गावांचा भामरागड आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाची चमू या आपत्तीला तोंड देण्यासाठी धावपळ करत आहे.