गडचिरोली : प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी अंतर्गत कांदोळी येथील 23 वर्षीय महिलेचा विष प्राशनामुळे मृत्यू झाला. तिला उपचारासाठी चक्क बाईकवर बसवून आरोग्य केंद्रात आणण्यात आले. खराब रस्ते आणि रुग्णवाहिका मिळण्यास विलंब झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र यात जिल्हा आरोग्य विभागाचा दोष नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 4 मे रोजी कांदोळी येथील संबंधित महिलेने ऑर्गॅनोफॉस्फरस हे विष प्राशन केल्याची घटना समोर आली. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी कांदोळी उपकेंद्रात न नेता किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी यांना पूर्वसूचना न देता थेट परस्पर दुचाकीवरून बुर्गी येथे नेण्याचा निर्णय घेतला. सकाळी 10.50 वाजता त्या महिलेला दुचाकीवर मध्ये आडवे बसवून प्राथमिक आरोग्य केंद्र, बुर्गी येथे आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी करून प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी येथील रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने पर्यायी चालकाची (खासगी) व्यवस्था करून त्या महिलेला रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पाठविण्यात आले. ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचार सुरू असताना विषबाधेची तीव्रता अधिक असल्यामुळे काही वेळातच संबंधित महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात खराब रस्ते आणि रुग्णवाहिका मिळण्यास विलंब झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यास उशिर झाला आणि त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
वास्तविक नातेवाईकांनी सुरुवातीला आरोग्य केंद्राशी संपर्क न साधता दुचाकीचा वापर करून रुग्ण नेल्यामुळे प्रारंभी विलंब झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर पुढील संपूर्ण प्रवास शासकीय रुग्णवाहिकेद्वारेच करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले.






























