
गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी मंगळवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कॅम्पसची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्याच्या या सर्वोच्च शैक्षणिक केंद्रात गुणवत्तेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे विदारक वास्तव समोर आल्याचे सांगत त्यांनी कोट्यवधींच्या निधीच्या गप्पा आणि मोठ्या घोषणांच्या पलीकडे, प्रत्यक्षात मात्र सामान्य विद्यार्थ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत असल्याचा ठपका ठवत संताप व्यक्त केला.
विविध विभागांच्या प्रयोगशाळांची स्थिती दयनीय असून तिथे साहित्याची प्रचंड कमतरता आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकाअभावी प्रयोगशाळांना टाळे लागण्याची वेळ आली आहे. साहित्याविना विद्यार्थ्यांनी प्रयोग तरी कसे करावेत, असा संतप्त सवाल यावेळी त्यानी उपस्थित केला. विद्यार्थ्यांची नोंदणी सातत्याने घटत असताना प्रशासन मात्र आत्मचिंतन करण्याऐवजी तांत्रिक कारणे पुढे करून आपली जबाबदारी झटकण्यात मग्न आहे. विद्यापीठ प्रशासनाने यापुढे केवळ कागदी घोडे न नाचवता तातडीने सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करून शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर लक्ष द्यावे. आमच्या जिल्ह्याचा विद्यार्थी या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे मागे पडणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना डॉ. नरोटे यांनी केल्या.
विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
यावेळी डॉ. नरोटे यांनी मुलांच्या वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता, त्यांनी जेवणाचा दर्जा व गुणवत्तेबाबत आणि मेसच्या गंभीर समस्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत डॉ. नरोटे यांनी स्वयंपाकगृहाची पाहणी केली. तिथे उघड्यावर फेकलेले अन्न, मेसमध्ये उघड्यावर पडलेले गंज (भांडी) आणि सर्वत्र पसरलेली अस्वच्छता पाहून डॉ. नरोटे यांनी संताप व्यक्त केला. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत इतके उदासीन कसे असू शकते? विद्यार्थ्यांच्या मेस कंत्राटात आणि देखभालीत कोणताही निष्काळजीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. तात्काळ वसतिगृहाची स्वच्छता करून मेसच्या दर्जात सुधारणा करा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी अन्य पाऊल उचलावे लागेल, असा इशारा डॉ. नरोटे यांनी दिला.
या भेटी दरम्यान भाजपा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, कुलसचिव अनिल हिरेखन, सिनेट सदस्य सतीश चिचघरे, रुपेंद्र गौर, स्वरूप तारगे आणि अरुण प्रकाश उपस्थित होते.






























