Home दैनंदिन बातम्या पाऊस आठवडाभराची विश्रांती घेणार, हवामान विभागाचा अंदाज

पाऊस आठवडाभराची विश्रांती घेणार, हवामान विभागाचा अंदाज

शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला

गडचिरोली : जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने थोडा दिलासा दिला. पण अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असताना आता वरुणदेव आठवडाभराच्या सुटीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रोवणीसाठी रोपं तयार झालेल्या, पण दमदार पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागणार आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुढील 8 ते 10 दिवस पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान बहुतांश शेतकरी यावर्षी आवत्या (थेट बियाणे शिंपडून) पद्धतीने धान लागवड करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.