Home दैनंदिन बातम्या ‘पोषण रसोई चॅलेंज’मध्ये स्थानिक भाज्यांपासून पौष्टिक पाककृती

‘पोषण रसोई चॅलेंज’मध्ये स्थानिक भाज्यांपासून पौष्टिक पाककृती

एटापल्लीत राष्ट्रीय पोषण माह साजरा

एटापल्ली : महिला व बालकांच्या पोषणाचा पाया मजबूत करण्यासाठी सीएचआरआय, एकात्मिक बाल विकास सेवा विभाग आणि के-कॅार्प चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एटापल्ली येथे 9 वा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय अधिकारी तथा एटापल्ली-भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) दीपक बानाईत, एटापल्लीच्या सीडीपीओ विद्याधर बुर्रीवार, बालरोगतज्ज्ञ डॉ.स्वाती रेड्डी, महागाव प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.लुबना हकीम, तसेच सीएचआरआयच्या प्रकल्प प्रमुख डॉ.अपूर्वा आकरे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात बालकांच्या आयुष्यातील पहिले 1,000 दिवस, कुपोषण प्रतिबंध, आहारातील विविधता आणि बालकांच्या निरोगी वाढीसाठी संतुलित आहाराचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ‘पोषण रसोई चॅलेंज 2026’ची पहिली फेरी ठरली. या उपक्रमात सहभागी अंगणवाडी सेविका व महिलांनी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेले धान्य, कडधान्य, भाज्या, फळे आणि इतर खाद्यपदार्थांसोबत टीएचआर (Take Home Ration) चा वापर करून बालक व कुटुंबासाठी विविध पौष्टिक, चविष्ट आणि आकर्षक पाककृती तयार करून त्यांचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमस्थळी स्थानिक भाज्या व विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शनही मांडण्यात आले. आपल्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये असलेले पोषणमूल्य आणि त्यांचा दैनंदिन कुटुंबाच्या आहारात समावेश कसा करता येतो, याची माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली.

यावेळी तज्ज्ञांनी ‘निरोगी आहाराची सुरुवात लहान वयापासून होते’ यावर भर देत, विशेषतः 6 महिन्यानंतर बालकाच्या आहारात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश आणि आहारातील विविधता यांचे बालकाच्या वाढी व विकासातील महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी एकत्रितपणे पोषण प्रतिज्ञा घेतली. आपल्या घरात, समुदायात आणि कार्यस्थळी आरोग्यदायी व पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पौष्टिक आहार हा महागडा किंवा अवघड नसून तो स्थानिक, परवडणारा, विविधतापूर्ण, चविष्ट आणि सहज उपलब्ध असू शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

आंगणवाडी पर्यवेक्षिका कोमल तुंगीडवार, माधुरी शेडमाके, सरिता लेकामे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यशस्वी आयोजनासाठी डॉ.सृष्टी पाटील, साहिल शेंदरे आणि अनिकेत चहांदे तसेच आयोजकांच्या चमुने सहकार्य केले.