Home राजकीय घडामोडी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अ.भा. किसान सभेची मागणी

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अ.भा. किसान सभेची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

गडचिरोली : एल निनोचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रभर दुष्काळाचे सावट पसरले आहे. धान, सोयाबीन, कापूस व खरिपातील सर्व पिकांचा त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेने काल (दि.23) राज्यव्यापी आंदोलन केले. गडचिरोली जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, प्रतिहेक्टर 50 हजार मदत देण्यात यावी, नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, जाहीर केलेला बोनस त्वरित देण्यात यावा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिड पट भाव देण्यात यावा, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, वाघ व हत्तींच्या हल्लात मृत्यू झालेल्या व्यक्तींना 50 लाख रुपये मदत देण्यात यावी, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना 5 हजार रुपये पेन्शन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व अमोल मारकवार, नाशिर हासमी, रुषी प्रधान, परसराम आदे, राजू मडावी, ताज कुरेशी, हरिदास मोगरकर, राजु सातपुते, संदीप शेन्डे इत्यादींनी केले. आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड व विनोद मडावी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.