शेकापच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी रामदास जराते

श्यामसुंदर उराडे मध्यवर्ती समितीवर

गडचिरोली : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त 2 व 3 ऑगष्टला पंढरपूर येथे झालेल्या 19 व्या अधिवेशनात पुढील 4 वर्षांकरीता पक्षाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, श्यामसुंदर उराडे यांची पक्षाच्या मध्यवर्ती समितीवर सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय जराते यांची शेकापच्या आदिवासी, भटक्या-विमुक्त आघाडीच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

मागिल अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय राहून रस्त्यावरचा लढा लढणारे रामदास जराते यांच्या कार्याची दखल घेवून पक्ष सभासदांनी सलग दुसऱ्यांदा मध्यवर्ती समितीवर त्यांची निवड केली. मध्यवर्ती समितीनेही त्यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या चिटणीस मंडळावर संधी दिली. अनुसूचित क्षेत्रातील कायदे आणि आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास व त्यासाठी त्यांनी चालविलेला संघर्ष लक्षात घेत त्यांना आदिवासी, भटक्या-विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली.