Home राजकीय घडामोडी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची धुरा पवन गेडाम यांच्या खांद्यावर

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची धुरा पवन गेडाम यांच्या खांद्यावर

दक्षिण भागासाठी सुरपाम यांना संधी

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये एकापाठोपाठ एक जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केला जात आहे. भाजप, काँग्रेसनंतर आता शिवसेना (उबाठा) पक्षाने जिल्हा प्रमुखांची खांदेपालट केली आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांना बढती देत त्यांच्याकडे गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. याशिवाय अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि विद्यमान उपजिल्हा प्रमुख दिलीप सुरपाम यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे सोपविण्यात आली.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने या बदलाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर शिवसैनिकांनी शुक्रवारी संध्याकाळी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयासमोर आतिषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले. शिवसेनेने डॅा.श्रीकांत बन्सोड यांना जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.

चार वर्षांपासून जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे वासुदेव शेडमाके यांना बाजुला सारत गेडाम यांना नवीन जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी जिल्ह्याला विधानसभा क्षेत्रनिहाय तीन जिल्हाप्रमुख होते. पण आरमोरी क्षेत्राचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केल्याने त्या क्षेत्रात सेनेत (उबाठा) पोकळी निर्माण झाली होती. वासुदेव शेडमाके यांनाही त्यांच्या कार्यकाळातील निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळवून देता आले नाही. त्यामुळे मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांन जिल्हा प्रमुखांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. त्यातून हा बदल करण्यात आला.

पक्षसंघटन वाढवून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना ताकद देण्याचे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांपुढे राहणार आहे.