गडचिरोली : मध्य प्रदेशातील झबुआ येथे रविवारी (दि.११ फेब्रुवारी) देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रात कार्यरत आदिवासी समाजातील मान्यवर, पदाधिकारी आदींचा विशाल महाकुंभ भरला होता. या महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या देशपातळीवरील आदिवासी महाकुंभच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी गडचिरोली-चिमूरचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्याकडे देण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या दहा वर्षात आदिवासी समाजासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांमुळे आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे सांगितले. पुढील काळातही भाजप सरकार आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आभार प्रदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी सरकारच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या योजनांमुळे समाज मुख्य प्रवाहात येत असून त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दूरदृष्टीला जाते असे सांगत गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, अशा अनेक राज्यातून आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील आदिवासीबहुल भागातील अनेक विविध विकासाच्या कामांचे ऑनलाइन लोकार्पण आणि भूमिपूजन केले. या महाकुंभला प्रामुख्याने केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रिय मंत्री फगनसिग कुलस्ते, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे आदिवासीमंत्री विजयकुमार गावित, केंद्रीय मंत्री भारती पवार, जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर ओराव आणि मोठ्या संख्येने जनजाती मोर्चाचे नेते उपस्थित होते.