
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री करणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने धाड टाकून कारवाई केली. यात संशयित कापूस बियाण्यांची 37 पाकिटे, सीलिंग मशीन तसेच कोरे पॅकेट असा एकूण 35 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून रामसागर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पुष्पा, बलवान व मालामाल या वाणांच्या संशयास्पद कापूस बियाण्यांची 37 पाकिटे आढळून आली. यासोबतच बियाणे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे सीलिंग मशीन आणि कोरे पॅकेटही जप्त करण्यात आले. जप्त बियाण्यांची किंमत 33 हजार 937 रुपये असून सीलिंग मशीनची अंदाजे किंमत 1 हजार 500 रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार, रा.रामसागर याच्याविरोधात चोमोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी म्हणून कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) चेतन चलकलवार यांनी तक्रार दिली. आरोपीविरुद्ध बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने केली. कारवाईत मोहीम अधिकारी आनंद पाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार, तसेच पोलीस विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.बनसोडे आणि पोलीस अंमलदार राहुल रामटेके यांनी सहभाग घेतला.
ही कारवाई कृषी विभागाचे संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे आदी वरिष्ठ अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.































