Home क्राईम आणखी एका शेतातून जप्त केला तब्बल 68 लाखांचा गांजा

आणखी एका शेतातून जप्त केला तब्बल 68 लाखांचा गांजा

एलसीबीसह धानोरा पोलिसांची कारवाई

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील गांजाच्या शेतीवर कारवाई केल्यानंतर आता धानोरा तालुक्यात एक गांजाचे शेत सापडले आहे. अंमली पदार्थ असलेल्या गांजाची शेती करून लाखो रुपये कमविण्याचे स्वप्न पोलिसांच्या या कारवाईने उधळवून लावण्यात आले. धानोरा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मोहली या गावातील शेतशिवारात पोलिसांनी कारवाई करत 68 लाखांचा गांजा जप्त केला.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनिय बातमीदारांकडून मोहली येथील ईश्वर सखाराम पुंघाटे (50 वर्ष) याने त्याच्या शेतशिवारात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आणि धानोरा येथील पोलीस पथकाने मोहली येथील पुंघाटे याच्या शेतात पोहचून पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी त्या शेतात अंमली पदार्थ गांजाची हिरवट रंगाची एकुण 91 लहान-मोठी फुले असलेले ओलसर झाडे लागवड केलेले दिसून आले.

यावेळी शेतातून 136.25 कि.ग्रॅ. वजन असलेली कॅनबिस वनस्पती (गांजा) मिळून आली. त्याची एकूण किंमत प्रतिकिलो 50 हजार रुपये प्रमाणे एकूण 68 लाख 12 हजार 500 रुपये आहे. आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये सदर अंमली पदार्थाची लागवड केली असल्याने आरोपी ईश्वर सखाराम पुंघाटे याच्याविरुध्द पोलीस स्टेशन धानोरा येथे गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन तो गांजा जप्त करण्यात आला. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. याचा तपास धानोरा येथील सपोनि प्रशांत जंगले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, तसेच पोस्टे धानोराचे सपोनि.प्रशांत जंगले व अंमलदार यांनी पार पाडली.